"मस्तवाल मित्र"


आयुष्यात एका सायंकाळी अचानक येतो एक "मस्तवाल मित्र"..! 
त्याच आपलं वेगळंच विश्व..!
स्वतःमधेच रमणारा..हसणारा अन हसवणारा…!
‘सगळ आयुष्य बदलून गेलंय’ अस असं म्हटलं तर नाटकी वाटेल, पण खूप काही नक्कीच हळू-हळू बदलू लागतं.
नेहमीच कामात गुंतून राहणाऱ्या आपल्याला सायंकाळच्या चहाची हटकून आठवण करून देणारा तो म्हणजे----
रागात विनाकारण वैतागायला हक्काचा माणूस..!
हवं तेव्हा रडून मन मोकळं करायला भक्कम आधार..!
कधी भल्या पहाटे उठून सूर्योदय पहायला वेडी सोबत तर कधी एका सायंकाळी त्याच टेकडीवर तासन तास संवाद साधणारा मुका सोबती..!
आपल्या सारखाच वेडी स्वप्ने पाहणारा… आपल्या वेड्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारा.. 
असा एक "मस्तवाल मित्र"..!
मग काय?
'दुनिया कि भीडसे  से दूर..हैराण..परेशान…' असणाऱ्या आपल्याला पुन्हा एकदा स्वतःच्या स्वप्नांवर.. स्वतःवर विश्वास वाटूलागतो.. पुन्हा नव्यानि काही स्वप्नं रंगवली जातात..  नव्या दमाने बेत आखले जातात.. अन कामाला सुरुवातही होते..
असा तो आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कधीतरी कुठे तरी येतोच… जगण्याच्या घाईत म्हणा अगर गत-काळाच्या चुकांमुळेम्हणाआपण त्याच्याकडे खुपदा दुर्लक्षच करतो.. तो हळूच येतो… खुपदा आपल्या नकळत आपल्यासाठी थांबतो.. गरज असते ती फक्त क्षणभर थांबून त्याचाशी हाथ मिळवायची…! मग काय Life मस्तचं होऊन जाते..अगदी आपल्या मस्तवाल मित्र सारखीच!

काही गोष्टी कधीच बदलत नाहीत


आज तुझ्याशी बोलताना.... त्या साऱ्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
काहीच बदललं नाही आपल्यातआपल्या नात्याशिवाय..!
आजही तू तसाच आहेस शांतअविचल,  तुझ्याचं जगात रमणारा.. स्वतःच्याच स्वप्नात हरवलेला.. तरीही आवर्जून आपल्या माणसाना जपणारा.. आणि मी...??? मी हि तर तशीचं  आहे अजून..
कधी कधी वाटत काय चुकलंकुणाच चुकलं?
जाऊ दे ना.. आजही आपल त्यावर एकमत होणार नाही...
आजही तेच संवाद....सवयीतले तेच शब्द...खूप बोलायचं असूनही  बोललं गेलेलं खूप काही आत आजही तसच खदखदत आहे पण मी बोलले नाही आणि तुही विचारलं नाहीस...
तरी आवर्जून मी म्हणालेच...'काही गोष्टी कधीच बदलत नाहीत'... त्यावर तुही म्हणालास 'कितीही प्रयत्न केला तरी...' पण मग ते नातंच नेमकं कस बदललं रे...?
निघून गेलास तू काहीच न बोलता...परत फिरून बोललाही नाहीस कधी मी बोले तोवर...
दिवसा मागून दिवस आणि वर्ष सुद्धा संपलीत अरे... पण आज...का कुणास ठाऊक सारख वाटत होत...
खरच काही गोष्टी कधीच बदलत नाहीत....
हो ना?


(असंच कधी तरी काहीतरी सुचत आणि न चुकता मी आवर्जून त्यासोबत लिहिते 'ह्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही...' हे माहिती असताना कि तू कुठे तरी वाचून मिश्कील हसत असणार...हो ना?) 

खास...


सहजच बोलताना कानी पडलेला शब्द आणि विचार करता करता सुचलं काही,
------------------------------'खास'............

College चा कट्टा..
Collegeत असताना नेहमीचाच..
पण college च्या शेवटच्या दिवशी..

------------------------------'खास'........

News-Paper रोजचाच..
आपल्या Team नी करंडक जिंकावा
आणि त्यात तो छापून यावा..
------------------------------'खास'.......


नेहमीचीच चहाची टपरीनेहमीचीच वर्दळ,
एक वळवाचा पाउस आणि मित्रांनी सांगितलेला,
अजून एक cutting चहा..
------------------------------'खास'............


कामात गर्क असताना,
अवेळी वाजलेला Mobile ,
आणि जुन्या मित्राचा Call ,
------------------------------'खास'............


Radio वर वाजणारी गाणी अनेक
पण अचानक मनात गुन-गूनणार
गाण कानी पडावं....
------------------------------'खास'............




जुन्या आठवणीत,
जुन्याच पुस्तकात,
मैत्रीणीच पत्रं सापडाव,
------------------------------'खास'............
कपाटाच्या कोपरयात,
जुन्या दैनंदिनीत,
मागच्या पानावर खरडलेली
माझी पहिली कविता..
------------------------------'खास'............

आयुष्य असंच तर आहे अनेक छोट्या-छोट्या खास क्षणांनी बनलेलं..
------------------------------'खास'.......... ------------------------'अगदी खास'.......

हे बरय तुझ..



हे बरय तुझ...
मी रोज रात्री तुझ्यासाठी जागायचं,
अन 'सकाळी लवकर उठायचय' म्हणून तू खुशाल लवकर झोपायचं???
हे बरय तुझ...
तुला कधी दुखलं कि मी चिंतेने मर-मर मरायचं...
अन 'उगाच चिंता करते तू' म्हणत तू मलाच हिणवायचं???
हे बरय तुझ...
तुला काय आवडत ते मी नेहमी लक्षात ठेवायचं...
अन मला काय हवंय ते तू चुकून पण नाही विचारायचं???
हे बरय तुझ...
तुझी वाट पाहत मी तासन तास बसायचं...
अन 'वेळ नाही मला' म्हणत तू स्वप्नात पण नाही यायचं??? 

वास्तव

हसऱ्या चेहऱ्या मागच दुःख खूप विद्रूप असत...
यशामागच अपयश खूप दारून असत...
अगदी झगमगत्या दिव्याखालच्या अंधाराइतक हे गहिरं असत..

क्षण

क्षण तुझे..क्षण माझे..
क्षण काही आपले..
क्षण पहिल्या प्रेमाचा..
क्षण तुझ्या विरहाचा..
गाठ-भेट आपुली अन त्या क्षणाला गोडी
ताटा-तूट होता दुज्या क्षणाला टोचणी..
क्षण एक स्वप्नातला,
क्षण एक वास्तवातला,
एका क्षणी धुके येई दाटून,
दुज्या क्षणी पडे सोनेरी उन..
क्षण मी जपलेले,
क्षण तू हिरावलेले,
क्षण आपुले हरवलेले..
क्षण रुसलेले
क्षण आसुसलेले
क्षण वेडे गुंतलेले
क्षण फक्त हुकलेले
क्षण माझे आतुर
अन क्षण तुझे फितूर
तुझा क्षण माझा अन माझा क्षण तुझा..
पण तरी क्षणाचा हा हिशोब चुकतो कसा?
कारण माझ्या ओंजळीतून तुझा तो एक क्षण नकळत निसटलेला..

सुन्या मैफिलीत माझ्या..

सुन्या मैफिलीत माझ्या,
तुझंच गाण मन रोज गात,
आठवणीना तुझ्या रोज बोलावत..
डोळ्यांना आस रोज तुझ्या येण्याची
पण भासच भेटतात रोज
अन जाणीव होते तुझ्या नसण्याची..
मन खिन्न होत,
मेहफिल होते उदास..
पुन्हा नवे आभास,
काही जुनेच भास,
पुन्हा तुझी आठवण,
जुनंच गाण नव्यानी गुण-गुणू लागते..
पुन्हा तू येणार ह्या आशेच एक नवं स्वप्न विनू लागते..
एक आठवण पुन्हा एक नवं स्वप्न
आणि..
स्वप्नांनाच तुझी सोबत!

कातरवेळी..

कातरवेळी जेव्हा तुझ्या आठवणी मनी दाटू लागतात,
माझ्याच सावल्या मग मला छेडू लागतात..
रातराणीचा गंध मनोहर,
तुझाच आभास दरवळावा जसा..
वारा शीळ घाली अशी,
तुझाच आवाज कानी पडावा..
तुळशीपाशी ज्योत फर-फरे,
माझ्या मनीची तग-मग होई..
तुला पाहण्या काळीज माझे सैर-भैर धाव घेई..
विरहात तुझ्या असह्य वेदना,
सरी होऊन डोळ्यातून कोसळू लागतात..
कातरवेळी..
तुझ्या आठवणी..
मनी दाटू लागतात..
माझ्याच सावल्या मग मला छेडू लागतात..

निशब्द रात्री..

निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात,
मनातल पुन्हा नव्यानी सांगू लागतात,
मनात दडलेली गुपित,
एकट्यानीच रचलेले मनसुबे,
स्वप्नात बनवलेले इमले, पुन्हा दिसू लागतात..
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..

कधी एकट्यानीच केलेली पायपीट,
कधी स्वतःशीच केलेली हितगुज,
स्वतःच स्वतः विरुद्ध मांडलेल्या बुद्धिबळात,
प्यादी मात देऊ लागतात..
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..

आयुष्याची मांडलेली गणित,
फिसकटलेले आपलेच डाव,
सुख-दुखाचे हिशोब नकळत चुकू लागतात..
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..

एकदा असाच..


नुकतच College संपल. आता कायमची सुट्टी! एक वेगळंच समाधान वाटत होतं. उद्या घरी जायला निघायचा म्हणून काय काय shopping & packing करायची ह्या विचारात रात्री केव्हा झोप लागली कळलंच नाही.
सकाळ झाली.. आज खर तर घरी जायचं म्हणून मी खूप खुश व्हायला हव होतं पण तरी एक रितेपणा जाणवत होता. काय झाला होता? ह्या विचारात मी घरातून बाहेर पडले.
बाहेर एक सुरेख सकाळ हळू हळू उमलत होती. सूर्य अलवार आकाशात डोकावत होता.. उंचच उंच वाढलेल्या माडाच्या झाडावर सोनेरी किरण पसरत होती.











पारिजातकाचा सडा पडलेला होता. लहान नाजूक फुलं ती...जपुन चालतानाही काही फुलं पायाखाली कोमेजलीच!
पलीकडच्या वळणावर बुचाची फुलं रस्ताभर विखुरली होती.. परसातली बुचाची पडणारी फुलं झेलण्याचा तो लहानपणीचा उद्योग आठवून हसू आल..
नेहमीच्या वाटेनी मी पुढे चालत जात होते. हळूहळू मन आठवणींची कवाड उघडून भूतकाळात उतरत होतं. नेहमीच्याच त्या चहाच्या टपरीवर नेहमीचीच वर्दळ. काही जण गरमा-गरम चहाचे भूरके घेत कालच्या क्रिकेटच्या सामान्यबद्दल चर्चा करत होते.. नुकताच, रोजचा morning walk संपवून आलेले गृहस्थ काखेतल वर्तमान पत्र सांभाळत, दुसरया हातातला चहाचा गरम पेला तोलत भ्रष्टाचारावर आपलं मत तावातावाने मांडत होते तर office ला वेळेत पोह्चायच्या घाईत एक तरुण गडबडीत चहा संपवत होता.. माझा चहा संपवून मीही निघाले.
रोज हे सगळं असच असतं..पण मग आज एक अनामिक हूर-हूर का?
परतीच्या वाटेवर हे कोड हळू-हळू उलगडू लागलं..
'ये चल उठ आत्ता' असा म्हणून मला रोज सकाळी उठवणारी माझी Dear Roomie आज नव्हती.. रोज कामाला जाण्याआधी प्राजक्ताची फुलं अलगद उचलून सजवणारी ती विद्या कालच तिच्या गावी गेली होती.. माडाच्या झाडावर अलवार पसरणाऱ्या सोनेरी किरणांना आपल्या क्यामेरयात टिपणारा राज आज नव्हता..गप्पात रंग भरणारा गट्टू, खळ-खळून हसणारी धनु, नेहमी उशिराने येणारा दीप..कुणी कुणी आज नव्हत.. चहाच्या टपरीवरच्या वर्दळीत मी आज एकटीच होते..
बुचाच्या फुलांनी दिलेल्या आठवणीने गहिवरून आलेला मन मोकळा करायला आज ह्यातला कुणी सोबत नव्हत..पण खरच का त्यांच्या नसण्यानी इतका फरक पडतो???
त्या फुलानाही का आज हे रितेपण जाणवत असावं? किरणांना का त्या एकट वाटत नसाव?
आज सगळ्या गप्पा शांत होत्या..आणि आठवणी पण एकट्या होत्या..
पण म्हणून का फुलं उमलायची थांबली नाहीत न किरणांनी उजळण सोडून दिलंय..
आठवणी पण अलगद डोकावतच होत्या..आमच्या नाहीत पण कुणाच्या तरी गप्पा रंगतच होत्या..
माझ्या उदास चेहर्यावर पुन्हा हसू उमलत होता.. आणि IPOD वर नुकतच गान बदलल होतं..
'जिंदगी कैसी हे पहेली हाये,कभी तो हसाये..कभी ये रूलाये..'

संभ्रम

डोक्यावर कुणीतरी घणाचे जोरदार घाव घालत आहे असं वाटत होत,
चोहीकडून प्रश्नांचा भडीमार होत होता,
कुणाचे प्रश्न? कोणते प्रश्न?
मी मलाच केलेले, माझेच प्रश्न..
भंडावून सोडतात ते मला,
मी मग वेड्याप्रमाणे त्यांची उत्तरं शोधत हिंडू लागते,
पण उत्तरं सापडतच नाहीत..
जिथे-जिथे आशेची किरण शलाका चमकून गेली तो प्रत्येक कोपरा मी चाचपून पाहीला..
पण संभ्रमाच्या ह्या गर्तेतून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नव्हता..
फक्त घणाचे घाव वाढत जात होते, मनातल्या वाढत्या प्रश्नान बरोबर..
अन..हाती काहीच लागत नाही..

एकटीच..


मला जपणाऱ्या माझ्या माणसांच्या गराड्यात पण मला एकता वाटत,
वेडं मन माझा तुलाच कुठे तरी शोधत राहत..
आईच्या कुशीत तुझ्या मिठीची उब शोधून पाहीली,
पप्पांच्या नजरेत तुझी ओढ शोधून पाहीली..
मित्रांचे विनोद आज मला पाहून हसू लागलेत,
मी हसले कि सखी चे डोळे नकळत भिजू लागलेत..
माझ्या माणसांच्या असण्यात तुझा नसणं जाणवत नाही असा नाही,
नवीन आयुष्य जगताना तुझ्या आठवणींना नको म्हटलं तरी मिटवता येत नाही..
पण..
तुझं नसणं खरं तर तुझ्या असण्याहून आणि सुखद वाटत ,
आठवणीत निदान चांगला-वाईट माझा मला ठरवता येतं..

एका रात्री..

काल उशिरा पर्यंत झोपच येत नव्हती.. सहज एक कविता खरडली आणि सगळ्यांना fwd केली.
एका friend चा reply आला , 'झोपली नाहीस अजून ?'
मी हि सहज उपहासात त्याला म्हटला कि 'नाही .. तारे मोजतेय..'
तर त्यांनीही म्हटलं, 'टीम-टीम नारेच मोज ..' :P.
तो कदाचित sms करून झोपी गेला असेल.. पण मी.. ???

मी सहज खिडकीतून आकाशकडे डोकावून पाहिलं..
आज आभाळहि दाटून आलेलं होत..
काल उशिरा पर्यंत झोपच  येत नव्हती..
खरा सांगू तर तुझी खूप खूप आठवण येत होती.
म्हटलं निदान टीम-टीम त्या ताऱ्यात तुला पाहावं पण आकाशालाहि काळ्या ढगांनी गवसणी घातली होती.
माझ्याच डोळ्यांत दोन तारे लख्खा चमकून गेले.
आणि ह्याच काळ्या आभाळाखाली
तुही त्या खिडकीपाशी
निजला असशील असे मी मनाला
खोटेच समजावले ...